फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - हम्पीचा सनसनाटी विजय; झू जायनर ची आघाडी कायम
GM झू जायनर (चीन) हिने GM आर. वैशालीला पराभूत करत FIDE पुणे ग्रांप्री २०२५ मध्ये ६ पैकी ५ गुणांसह आपली एकहाती आघाडी कायम ठेवली असून निर्णायक स्थितीत वैशालीने तिचा घोडा चुकीच्या पद्धतीने हलवला आणि चुकीचा एक्स्चेंज करून स्वतःलाच बिकट एंडगेममध्ये अडकवले. IM बटखुयाग मंगुंतूल (मंगोलिया) हिच्यावर GM कोनेरू हम्पीने सहज विजय नोंदवला. हम्पीने आपले गुण ४.५/६ पर्यंत नेत स्पर्धेतील आपले स्थान कायम टिकवले. IM दिव्या देशमुख हिने GM हरिका द्रोणावल्लीबरोबर बरोबरी साधली आणि तिचा गुणसंख्या ४/६ झाली. आज हम्पी आणि झू जायनर यांच्यातील लढत अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्याचा परिणाम स्पर्धेच्या अंतिम निकालावर निश्चितच होऊ शकतो. सातव्या फेरीला आज दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. फोटो : अनमोल भार्गव
झू जायनर (चीन)कडून विजयाची नोंद : एकल बढत कायम

बटखुयाग - हम्पी : ०-१
GM कोनेरू हम्पीने आजवर बटखुयाग मंगुंतुल सोबत खेळलेल्या एकूण ९ क्लासिकल सामन्यात ५.५-३.५ अशी आघाडी घेतली होती. तीच आघाडी बळकट करीत हम्पीने आज मंगुंतुल हिला सहजरीत्या हरवले. टू नाईट डिफेन्स मध्ये सुरु झालेल्या डावात हम्पीने ५. exd5 नंतर b5 खेळले.

१४.Nge4?? Qf5 १५.Ne2 g5 ह्या चालीनंतर काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या हम्पीला केवळ पंधरा चाळीत विजय निश्चिती करून देईल अशी परिस्थिती मिळाली आणि त्याच संधीचा लाभ घेत अगदी सोप्पा विजय तिने सहाव्या फेरीत नोंदवला.


झू जायनर - वैशाली : १-०
क्लासिकल बुद्धिबळ प्रकारात वैशालीने आजवर झू जायनर वर विजय मिळवलेला नाही. दोन सामन्यात झू जायनर हिने विजय मिळवला तर एक सामना बरोबरीत सुटला. अत्यंत मोक्याच्या क्षणी वैशालीने आपला घोडा चुकीच्या ठिकाणी हलवत पाटावर गुंतागुंत अधिक वाढवली आणि त्यातून बाहेर पडणे तिलाच शक्य झाले नाही.

वैशालीने २५. .... Qh3 26.Nxd5 Nh4 खेळणे गरजेचे होते पराठू तिने २५...Ne3 खेळल्याने आणि परिणामी जायनर कडून आलेल्या २६.Re1 ह्या अचूक चालीमुळे Rh6 ही चाळ जवळपास फोर्स्ड असताना २६...Nxc2?? खेळल्याने डावात अचानक एकामागून एक पिसेस एक्स्चेंज होत गेले आणि परिणामी आलेली स्थिती ही झू जायनर हिचे पारडे जड करणारी होती. २७.Nxd5 Nxe1 २८.Ne7+ Rxe7 २९.Qxe7 h6 ३०.Re2 यानंतर मात्र झू जायनर हिने डावावर ताबा मिळवत स्पर्धेतील आपला अजून एक विजय मिळवून आपली आघाडी भक्कम केली.



बक्षिसे :
एकूण बक्षीस निधी €८०,००० इतका आहे. त्यापैकी पहिले तीन क्रमांकाचे बक्षिसे अनुक्रमे €१८०००, €१३०००आणि €१०५०० आहेत. तसेच टॉप तीन ग्रँड प्रिक्स पॉइंट्स पुढीलप्रमाणे आहेत: पहिला क्रमांक: १३० गुण, दुसरा क्रमांक: १०५ गुण, तिसरा क्रमांक: ८५ गुण
स्पर्धेचे वेळापत्रक :
ही स्पर्धा १४ एप्रिल २०२५ पासून २३ एप्रिल २०२५ पर्यंत होणार आहे.

 
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                            